शरद पवार घेणार रिस्क? आमदार संग्राम जगतापांसमोर “या” इच्छुक उमेदवाराच्या नावाची चर्चा…!
अहिल्यानगर :- विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. नगर शहर विधानसभा मतदार संघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या नावावर शिक्का मोर्तब आहे..! मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही नगर शहर मतदारसंघामध्ये उमेदवाराबाबत साशंकता असल्याने महाविकास आघाडी कोणाला तिकिटं देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नगर मतदार संघात सुरवातीला एक ना अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र हळुहळू माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव चर्चेत आल्याने अनेकांनी वेट & वॉचची भूमिका पसंत केली आहे. त्यामुळे एनवेळी महाविकास आघाडी कोणती खेळी करणार हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे…
शहरात माजी महापौर संदीप कोतकर यांच्या नावाची चर्चा सुरु होताच अनेकांनी आनंद तर अनेकांनी विरोध देखील दबक्या आवाजात व्यक्त केला. मात्र शहरात संदीप कोतकर यांच्या नावाची जरी चर्चा सुरु असली तरी महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी महापौर संदीप कोतकर हातात तुतारी घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे असं असलं तरी महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी कोतकर यांच्या नावावर विचार करणार कां? हे पाहणे देखील तितकेच महत्तवाचे ठरणार आहे….!
शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा समविचारी असणारी महाविकास आघाडी यांनी वेळोवेळी महायुतीतील विशेषतः भारतीय जनता पार्टीवर गुन्हेगारी किंवा गुन्हेगार पोसविण्याचा आरोप केला आहे. एवढंचं नाही तर भाजपाचे असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात गुन्हेगारी वाढल्याचे गंभीर आरोप करत त्यांच्या राजिनाम्याची मागणी महाविकास आघाडीकडून सातत्याने केली गेली आहे. त्यामुळे शरद पवारांनी कोतकर यांना उमेदवारी दिल्यास महायुती कायद्याच्या कचाट्यासह चारही बाजूने पवारांना घेरणार हेही तितकंच खरं. त्याचप्रमाणे न्यायालयाने कोतकर यांची जिल्हा बंदी फक्त डिसेंबर पर्यत उठवली असल्याने त्या नंतर काय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे? त्यामुळे अश्या परस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या नगरच्या जागेबद्दल खुद्द शरद पवार किती रिस्क घेतात खरंतर हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.
त्यामुळे आज जरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जगताप यांच्या विरोधात संभाव्य असलेल्या संदीप कोतकर यांची “माऊथ पब्लिसिटी” होत असली तरी क्रिकेटसारख्या राजकारणातल्या शेवटच्या चेंडूवर कोण षटकार मारणार हे येणारा काळचं ठरविणार हे मात्र नक्की….!