पहा :- काय आहे नवा ‘हिट अँड रन’ कायदा? ज्याचा ट्रक ड्रायव्हर्स करतायंत विरोध ( New Hit-and-Run Law )
अहमदनगर – मुंबई, औपनिवेशिक काळातील गुन्हेगारी कायद्यातील बदलांमुळे हिट-अँड-रन प्रकरणांमध्ये दिली जाणारी शिक्षा आता वाढली आहे. ज्यामुळे देशभरातील ट्रक ड्रायव्हर्सकडून याचा निषेध व्यक्त होत आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता.
हिट अँड रनच्या नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांचे खासगी चालक एकवटले असून ते आज संपावर गेले आहेत, तर ऑटोचालकांनीही नव्या कायद्याविरोधात मोर्चा उभारला आहे. नवीन कायदा हा चालकांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करेल तसेच नवोदित ड्रायव्हर्सना सुद्धा या क्षेत्रामध्ये नोकऱ्या घेण्यापासून परावृत्त करू शकेल असा आरोप ट्रकचालक करतात.
ट्रक चालकांचे म्हणणे आहे की, “कोणीही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात घडवत नाही, तसेच जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास तेथे जमलेला जमाव त्यांना मारहाण करेल”, तेव्हा ट्रक चालक संघटनांकडून हा ‘काळा कायदा’ रद्द करण्याची मागणी केली जात आहे. तसेच अनेकदा वातावरणात धुक्याची चादर पसल्याने गाडी चालकांना समोरचे दृश्य दिसत नाही, अशावेळी अनेक अपघात होतात. परंतु या परिस्थितीमुळे जर चालकाच्या हातून अपघात झाला तरी त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली जाऊ शकते, अशी भीतीही ट्रक चालकांनी व्यक्त केली.
केंद्राच्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खासगी आणि रोडवेज वाहतूक बंद ठेवण्यात आली असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मालवाहतूक सेवा सुरू करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे