रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरेला अटक ; जामखेड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार होता मोरे ;
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल अँड फार्मसी रिसर्च सेंटर या कॉलेजचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे हा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची आर्थिक शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.
शारीरिक छळ होत असल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केल्यानंतर जामखेड पोलीस ठाण्यात डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला डॉक्टर मोरे याला अखेरकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर भिगवण येथून उसाच्या शेतातून अटक केली आहे.
रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत होती, फीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात होते त्याचप्रमाणे विद्यार्थिनींचा देखील शारीरिक छळ येथे केला जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला होता त्यानुसार विद्यार्थ्यांनी गेल्या आठ दिवसापासून आंदोलनाचा हत्यार उपसल होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू करताचं नाशिक, पुणे तसेच रायगड येथील विद्यापीठाच्या समितीने रत्नदीप मेडिकल कॉलेजला भेट दिली होती.
यावेळी समितीला कॉलेजमध्ये भरपूर त्रुटी आढळून आल्यानंतर समितीने कॉलेजच्या सहा प्रयोगशाळांना देखील सील केले होते मात्र जोपर्यंत कॉलेजची मान्यता रद्द होत नाही व डॉक्टर भास्कर मोरे याला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता.
दरम्यान विद्यार्थ्यांचा रोष बघता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक पुणे, इंदापूर आणि यवत या भागामध्ये आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते, दरम्यान या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता अखेरकार डॉक्टर भास्कर मोरे हा इंदापूर येथील भिगवन या ठिकाणी असलेल्या एका उसाच्या शेतामध्ये आढळून आला असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे