अहमदनगर – रात्रंदिवस डोळ्यात अंजन घालून तळपत्या उन्हात पायाचे गोळे करून वाहतूक शाखेचे कर्मचारी अधिकारी आपलें कर्तव्य बजावत असतात मात्र सध्या शहरात वाहतूक शाखेच्या नावाखाली सावळा गोंधळ सुरु असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. वाहतूक शाखेच्या नावाखाली शहरात दलालांचा सुळसुळाट झाला असून तीन चाकी रिक्षा चालकांना या दलालांचा त्रास सहन करावा लागत आहे. खरंतर काही दिवसापूर्वी वाहतूक शाखेच्या नावाखाली आमजत नामक व्यक्ती हैदोस घालत असल्याचे बोलले जातं होते. मात्र आता एकटा आमजत नसून वेगवेगळ्या महामार्गांवर एक ना अनेक आमजत फोफावले असल्याची चर्चा नगर शहरात होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेली आमजत नामक व्यक्तीच्या चर्चेबद्दल आता खुद्द पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जातीने लक्ष घालून आमजत आहे तरी कोण? याचा तपास करून योग्य कारवाई करणे गरजेचे आहे. एवढ्यावरच न थांबता वाहतूक शाखेची आबरू चव्हाट्यावर आणणाऱ्या वेगवेगळ्या महामार्गांवरील एक ना अनेक दलालांना वेळीच पायबंद घालण्याची गरज आहे अन्यथा हे दलाल वाहतूक शाखेची आबरु वेशीला टांगल्याशिवाय राहणार नाही हेही तितकेच खरे.
शहरात गेल्या अनेक दिवसापासून भिंगार मार्गांवर चालविल्या जाणाऱ्या रिक्षा चालकांना आमजत नामक व्यक्तीचा त्रास होता? आमजत आहे तरी कोण याबाबत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे होते. मात्र तो आमजत तर सोडा अहमदनगर शहरातील प्रत्येक महामार्गांवर आमजत सारखे एक ना अनेक दलाल रिक्षा चालकांना त्रास देऊन वाहतूक शाखेच्या नावाखाली सर्रासपणे पैश्याची मागणी करत असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरु आहे? शहरातून जाणाऱ्या वेगवेगळ्या महामार्गांवर रिक्षा चालक पोटाची खळगी भागविण्यासाठी रात्र दिवस मेहनत करतातं मात्र हे दलाल प्रत्येक रिक्षा चालकाकडून अव्वाच्या सव्वा हप्त्याची मागणी करत असल्याची चर्चा रिक्षा चालकांमध्ये होत आहे?
वाहतूक शाखेच्या नावाखाली शहरात दलालांचा सुरु असलेल्या सावळ्या गोंधळा बाबत याआधी देखील डेली टाइम्सने बातमी प्रसारित केली होती. मात्र याबाबत वाहतूक शाखेकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे दिसत आहे? त्यामुळे या दलालांना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा पाठबळ तर नाही ना हीच शंका रिक्षाचालक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या नावाखाली सुरु असलेल्या सावळ्या गोंधळाबाबत जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जातीने लक्ष घालून कारवाई करावी अशीच मागणी आता सर्व सामान्य रिक्षा चालकांकडून होत आहे…
पुढील भागात पहा कसा दिला जातो त्रास, किती होते अव्वाच्या सव्वाची मागणी, वाहतूक शाखेच्या नावाखाली किती महामार्गांवर चालतो सावळा गोंधळ…!