“गद्दारी कीं बंड”? महाराष्ट्रातील राजकारणाचा नवा अध्याय
Umer Sayyed
राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा दीला आहे. तब्बल २६ आमदारांसोबत अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालून घेतली आहे मात्र राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या धक्कादायक खुलाश्या नंतर अजित पवार व त्यांच्या सहकारी आमदारांनी राष्ट्रवादी पक्षाशी म्हणा किंवा शरद पवार यांच्याशी गद्दारी केली कीं बंड ? हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अजित दादा हें उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी ते महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. राज्याच्या विरोधी नेत्यानेच चक्क भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी केलेले बंड हि गद्दारी असू शकते तर दादांनी भाजपाला दिलेला पाठिंबा नेमका काय गद्दारी कीं बंड ? याबाबत देखील राज्याची जनता तर्कवितर्क लावत आहे.
खरंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत रुसवेफुगवे सुरू असल्याच्या बातम्या येतं होत्या. पक्षातच सुरू असलेल्या नाराजी नाट्याला वैतागून कदाचित पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दीला असावा? त्यावेळी देखील पक्षातील सारेच नेतेमंडळी पवारांना राजीनामा परत घेण्याचा आग्रह करत असतांना दुसरीकडे मात्र अजित पवारांनी हें आज नाही तर उद्या होणारच होत अशी प्रतिक्रिया देत अनेकांना धसकाच दीला होता. दरम्यान त्यावेळी शरद पवारांनी दिलेला राजीनामा परत घेतला मात्र अवघ्या दोन दिवसात पक्षाच्या कार्याध्यक्ष पदावर सुप्रिया सुळे यांना विराजमान करण्याचा निर्णय घेतला आणी त्यामुळे कदाचीत पक्षात सुरू असलेल्या रुसवे फूगव्याचा फुगा तेथेच फुटला?
परंतु असे असले तरी भाजपा व शिंदें गटावर धार लावून बसलेल्या दादांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. बेरोजगारी पासून तर महागाई पर्यंत तसेच शिंदेंनी केलेल्या बंडा पासून तर थेट 50 खोक्यापर्यंत दादांनी शिंदें फडणवीसांवर चौफेर फटकेबाजी केली. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्यानां गद्दाराची उपाधी देत चक्क विरोधी पक्ष नेते व प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेंनीं केलेल्या बंडाचा गद्दार दिवस देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने साजरा केला गेला . एकनाथ शिंदेंनी ठाकरेंशी गद्दारी केली असा आरोप करत वर्षांपूर्तिला आंदोलने देखील करण्यात आले. आणी आज त्याचं शिवसेनेच्या एकनाथ शिंदें व त्यांच्या सहकाऱ्यांची पुनरावृत्ती पहायला मिळाली. चक्क राज्याचा विरोधी नेताच सत्ताधाऱ्यांच्या मांडिला मांडी लाऊन बसणार असल्याच वृत्त समोर आलं आणी पुन्हा तोच शब्द जनतेच्या मुखातून पडला कीं अजित दादांनी भाजपाल दिलेला पाठिंबा हि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी केलेली गद्दारी कीं बंड ?
राष्ट्रवादी पक्षात अजित पवार म्हंटल कीं रुसवे फुगवे होणारंच दादांचा तापट, रागीट स्वभाव अनेकांना नाराज करायचा? एवढेच नव्हे तर 2019 च्या निवडणुकीत दादांचे पुतणे असलेले रोहित पवार यांचा विधानसभेत वीजय झाला तर दुसरीकडे दादांचा पार्थ पडला त्यावेळी देखील पवार कुटुंबातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे काकांचा गेम हा पुतण्याच करनार याची कुणकुण सर्वांना होती? परंतु अजित पवारांसोबत भाजपाला पाठिंबा देणारे दिलीप वळसे पाटील असों कीं छगन भुजबळ यांना पक्षाने कधी नाराज केले हें क्वचितच ऐकायला मिळत असे त्यामुळे ज्या पक्षाने व पक्षाच्या प्रमुखाने आपल्या सहकाऱ्यांसाठी जिवाच रान केलं, ज्यांच्या नावावर निवडणूका जिंकून मंत्रिपदे मिळवली अश्यानीं पक्षाशी बंड करने हें कितपत योग्य, छगन भुजबळांचे “ते” दिवस व त्यानंतर पक्षात असलेला तोच रुबाब हें कोणामुळे, मग छगन भुजबळ, तटकरे, वळसे पाटील, लंके यांच्या या बंडाला बंडच म्हणायचं कीं गद्दारी ? हाच प्रश्न आज सर्वसामान्यांना पडला आहे.
भारतीय जनता पार्टी हि हिंदुत्ववादी विचारणं प्रेरित मात्र बंड करून गेलेले हें सेक्युलर ना ? पुरोगामी चळवळीचा इतिहास सांगणारे, मनु स्मृती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणारे मग अश्या लोकांसोबत कशे वीचार जुळणार आणी कसा होणारं “विकास”, राष्ट्रवादीला सुरुंग लावणाऱ्यांनीं देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला सिंचन घोटाळा असों किंवा हसन मुश्रीफ यांच्या संबधित बँक – कारखाना असों या नेत्यांवर भाजपानेच ऐकेंकाळी टीका केली आरोप केले. मग तुम्ही केलेल्या आरोपींनुसार याचं भ्रष्टाचारी नेत्यांचा पाठिंबा का घेतला असे एक ना अनेक प्रश्न आज महाराष्ट्राच्या सर्व सामान्य जनतेला भेडसावत असून अजित पवारांसह त्यांच्या 26 आमदारांनी भाजपाला दिलेला पाठिंबा हि गद्दारी कीं बंड? हाच मुद्दा पुन्हा चर्चा विषय ठरला आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी व भाजपाने देखील उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर बोट उचलले होते.मात्र आता पवारांच्या बंडाने उद्धव ठाकरे यांच्यावरच ओझ कमी झालं असं बोललं तर वावगं ठरणार नाही , तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असं परखड मत महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलं आहे….!